शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेबचे वडील मोहम्मद हनीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी भाजपात सहभागी होऊ शकतात. यावेळी पंतप्रधान मोदी हे जम्मूच्या दौऱ्यावर येत आहेत. रायफलमन औरंगजेब यांचे १४ जून २०१८ रोजी दहशतवाद्यांनी अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या केली होती.

शहीद औरंगजेब यांचे कुटुंबीय पुंछ जिल्ह्यात राहतात. त्यांचे वडील मोहम्मद हनीफ हेही माजी सैनिक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद हनीफ यांची भाजपा नेत्यांनी भेट घेतली असून त्यांना पक्षात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते. त्यांचे नाव स्वीकृतीसाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे पाठवले आहे.

१४ जून २०१८ रोजी ईदच्या सुटीसाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचे पुलवामा येथील कालम्पोरा येथून अपहरण करण्यात आले आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ईदच्या दिवशी औरंगजेब यांच्या सलानी गावात शोककळा पसरली होती. त्यावेळी औरंगजेब यांच्या वडिलांनी सरकारला ७२ तासांचा वेळ दिला होता. मी सरकारला ७२ तास देतो. नाहीतर मी स्वत: जाऊन बदला घेईन, असे त्यांनी म्हटले होते.