शिवसेनेने कृषी तज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केल्यानंतर आता ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे नावही चर्चेत आले आहे. ते एनडीएनचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण स्वत: श्रीधरन यांनी मात्र या सर्व चर्चा फोल असल्याचे सांगत एनडीएच्या कोणत्याही नेत्याबरोबर माझी याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी अराजकीय व्यक्तीचे नाव पुढे केली जाण्याची शक्यता पूर्वीपासून व्यक्त केली जात आहे. आपल्या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपकडून देशातील इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेणे सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेनेने डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले आहे.

परंतु, श्रीधरन यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. माझी कोणाबरोबरच चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी ‘एनडीए’कडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच शरद पवार यांच्याशी चर्चा केली असून ते लवकरच त्यांना भेटण्याची शक्यता आहे. याशिवाय, आज दिल्लीत नायडू आणि राजनाथ सिंह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. आम्ही विरोधकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राष्ट्रपतीपदाबाबतच्या चर्चेत त्याचा विचार करता येईल, अशी प्रतिक्रिया नायडू यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, कालच कोची मेट्रोच्या उद्घाटनाला ई. श्रीधरन यांना निमंत्रित न करण्यात आल्यामुळे मोठा वाद रंगला होता. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर आधी श्रीधरन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. केरळ सरकारने श्रीधरन यांच्या नावाचा समावेश निमंत्रण पत्रिकेत करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला लिहिले होते. यासोबतच केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांच्या नावाचा समावेशदेखील निमंत्रण पत्रिकेत करण्यात यावा, अशी मागणी केरळ सरकारने केली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने केवळ चेन्नीथला यांच्या नावाचाच निमंत्रण पत्रिकेत समावेश केला. या निर्णयावर अनेकांनी टीका करण्यास सुरूवात केली. अखेर काल संध्याकाळी ई. श्रीधरन यांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.