मलेशियाचे बेपत्ता झालेले एमएच ३७० हे विमान थायलंड-अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतींच्यावेळी पाडण्यात आले व नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला, असा गौप्यस्फोट एका पुस्तकात करण्यात आला आहे.
या दाव्यामुळे या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्वालालंपूर येथून बीजिंगकडे जाण्यासाठी निघालेले विमान अजूनही सापडलेले नाही. या विमानाच्या अपघातानंतर ७१ दिवसांनी म्हणजे सोमवारी फ्लाइट एमएच ३७० – द मायस्टरी  हे पुस्तक ऑस्ट्रेलियात विक्रीस येत असून त्यात हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे असे संडे हेराल्डने म्हटले आहे.
अँग्लो अमेरिकन पत्रकार व लेखक निगेल कॉथॉर्न यांनी हे पुस्तक लिहिले असून त्यात ते म्हणतात की, प्रवाशांच्या नातेवाईकांना त्यांचे काय झाले हे माहीत नाही पण आपल्या मते न्यूझीलंडचा तेल कामगार माइक मॅकके याने दिलेल्या माहितीनुसार हे विमान संदेशवहन यंत्रणा थांबल्यानंतर पाडण्यात आले. त्यावेळी दक्षिण चीनच्या सागरी प्रदेशात थायलंड-अमेरिका यांच्यात लष्करी कवायती सुरू होत्या. त्यात हे विमान पाडण्यात आले. थायलंडच्या आखातातून एक पेटते विमान पडताना दिसले होते. चीन, जपान, इंडोनेशिया व इतरांनी तसेच काथॉर्न यांनी मॅकके याचा दावा खरा मानून त्या आधारे हे विमान पाडण्यात आल्याचे प्रतिपादन केले. लष्करी कवायातीतील एकाने चुकून एमएच ३७० विमान गोळीबार करून पाडले, अशा गोष्टी घडतात, कुणालाच दुसरे लॉकरबी नको आहे, ते पॅन अ‍ॅम विमान अतिरेक्यांनी १९८८ मध्ये पाडले होते. आता हे विमान चुकून पाडले गेले असून त्यावर गुप्तता पाळली जात आहे.
काथॉर्न यांच्या मते दुसराच ब्लॅक बॉक्स ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर टाकून नाटक करण्यात आले व शोध पथकाला चुकीची दिशा देण्यात आली. शेवटी दक्षिण हिंदी महासागरात सांगाडा सापडला नाही. यामुळेच संशय बळावला आहे. एमएच ३७० विमानात आयरिन बरोड यांचे पुत्र वसून हे प्रवासी होते. त्यामुळे आयरिन यांनी या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर संताप व्यक्त केला आहे. काय झाले हे कुणालाच माहिती नाही मग आताच हे पुस्तक काढण्याची काय गरज होती असा सवालही त्यांनी केला.