पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.

अवश्य वाचा – २२ हजार कोटींच्या बँकिंग घोटाळ्यावर मोदींनी २ मिनिटे तरी बोलावे: राहुल गांधी

आपल्या व्यंगचित्रात मोदी आणि जेटली यांना राज ठाकरे यांनी रखवालदाराच्या वेशात एका बँकेबाहेरील बाकड्यावर बसून झोपा काढताना दाखवलं आहे. तर याचा फायदा घेत मल्ल्या, मोदी सारखी माणसं पळून जाताना पाहून सामान्य माणूस काय विचार करत असेल हे देखील राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवलं आहे. नेहमीप्रमाणे राज यांच्या या व्यंगचित्राला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी फसवणुकीच्याद्वारे बँकेच्या परदेशस्थ शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. मात्र त्याविषयी बँकेच्या यंत्रणेत कोणतीच नोंद झाली नव्हती. या संशयाच्या आधारेच बँकेने कंपन्यांविरोधात पहिली तक्रार दिली होती. शेअर मार्केटला या घोटाळ्याची माहिती देणे बंधनकारक असल्याने बुधवारी बँकेने ही माहिती कळवली आणि या घोटाळ्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. ११, ४०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात हिरेव्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या काही कंपन्या तसेच अन्य नामांकित जवाहिरे कंपन्यांवर संशय आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून या घोटाळ्याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या असून सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणी नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.