भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱयांना यापुढे लालफितीचा सामना करावा लागणार नाही, तर लाल गालिचा घालून त्यांचे स्वागत केले जाईल, असा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानमधील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करणे सोयीचे व्हावे, यासाठी आपल्या सरकारने अनेक अटी रद्द केल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत जे झाले नाही, ते आपल्या सरकारने अवघ्या १०० दिवसांत करून दाखवले, असा दावाही यावेळी मोदी यांनी केला.
‘जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन’ने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना भारतात गुंतवणूक करणे जपानी गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले, भारतात विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरू व्हावेत आणि उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे. सध्यातरी गुंतवणूक करण्यासाठी भारताशिवाय दुसरा चांगला देश नाही. भारत हा एकमेव देश आहे जिथे डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या तिन्ही गोष्टी सापडतात.
जपानमधील गुंतवणूकदारांना भारतात लोकशाही प्रक्रियेसोबतच सुरक्षितता आणि न्याय या दोन्ही गोष्टी मिळतील, असेही त्यांनी सांगितले. आर्थिक विकासदर ५.७ टक्क्यांवर गेल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.