दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता दिल्लीचे माजी मंत्री सोमनाथ भारती यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केले.
भारती यांच्याविरुद्ध पत्नीने खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. भारती यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांना कागदोपत्री पुराव्यांमुळे पुष्टी मिळत असल्याचे कारण देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
दिल्लीच्या दक्षिण भागांत मध्यरात्री छापा टाकून आफ्रिकेतील महिलांना लक्ष्य केल्याप्रकरणी भारती यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास दिल्ली सरकारने अनुमती दिल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारती यांनी शरणागती पत्करावी, असा स्पष्ट संदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारती यांना बुधवारीच दिला होता.