सर्वोच्च न्यायालयाच्या आधारबाबतच्या निकालानुसार परमनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे अनिवार्य करण्यात आले असून आतापर्यंत २१.०८ कोटी लोकांनी हे दोन क्रमांक एकमेकांशी जोडले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार प्राप्तिकर खात्याने जारी केलेले २१०८१६७७६ इतके पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. एकूण पॅनकार्ड किंवा क्रमांकांची संख्या ही ४१.०२ कोटी  (४१०२६६९६९)असून त्यातील २१.०८ कोटी कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची तारीख पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. याबाबतचा आदेश ३० जूनला जारी करण्यात आला होता. नवीन माहितीनुसार ४१.०२ कोटी पॅन कार्डमधील ४०.०१ कोटी कार्ड हे व्यक्तींच्या नावावर आहेत. बाकीच्या कंपन्या व करदाते यांच्या नावावर आहेत. त्यामुळे फक्त पन्नास टक्के पॅन क्रमांक किंवा कार्ड हे आधार क्रमांक किंवा कार्डशी जोडले गेले आहेत. आधार क्रमांक व पॅन क्रमांक जोडण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच वेळा वाढवून देण्यात आली होती.

आधारबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आधार व पॅन क्रमांक जोडण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. सरकारने प्राप्तिकर विवरणपत्रात आधार क्रमांक देणे सक्तीचे केले होते. प्राप्तिकर कायदा कलम १३९ एए (२) अन्वये १ जुलै २०१७ अखेर ज्या व्यक्तींकडे पॅनकार्ड असेल व ती व्यक्ती आधारसाठी पात्र असेल तर त्यांनी आधार क्रमांक प्राप्तिकर खात्यास देणे बंधनकारक आहे. आधार क्रमांक किंवा कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहे, तर पॅनकार्ड  किंवा परमनंट अकाऊंट नंबर हा दहा अंकी क्रमांक प्राप्तिकर खात्याने जारी केला आहे.