बिहारचे सत्ताधीश कोण, हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल आज येणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणरा आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले. प्रत्येक टप्प्यागणिक लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी सत्तांतराला कौल दिला आहे. दरम्यान, निकालापूर्वीच आता नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी निकालापूर्वीच महाआघाडीवर जोरदार टीका केली.

“महाआघाडीच्या लोकांनी आणखी थोडावेळ आनंद साजरा करून घ्यावा. कारण बिहारची जनता त्यांना स्वीकार करणार नाही,” असं शाहनवाज हुसैन म्हणाले. महाआघाडीकडून लाडू बनवले जात असल्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. महाआघाडीचे लोकंच ते लाडू खाऊन टाकतील. त्यांना ते लाडू पचणारही नाहीत. बिहारची जनता महाआघाडीला कधीही स्वीकारू शकत नाही. बिहारच्या लोकांनी आरजेडीचं शासन पाहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“बिहारमध्ये आमचंच सरकार सत्तेत येईल,” असा दावा यावेळी शाहनवाज हुसैन यांनी केला. “मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वांना याचं उत्तर मिळेलच. यावेळी बिहारमध्ये आमचा विजय होईल आणि महाआघाडीचा पराभव,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या संकटात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मतदानानंतरच्या चाचण्यामध्ये महाआघाडी सत्तेवर येण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला आहे? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. आहे. बिहारचे सत्ताधीश कोण, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.