जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला (Volkswagen) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला ५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यात भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने कंपनीला दंड केला आहे. या उपकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याऐवजी त्याच्या आकडेवारीत बदल केला जात होता.
National Green Tribunal was hearing a petition seeking ban on sale of Volkswagen vehicles for alleged violation of emission norms. https://t.co/1LRzRfewH1
— ANI (@ANI) March 7, 2019
तत्पूर्वी, एनजीटीने जानेवारीतही फॉक्सवॅगनला १०० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. पण त्यावर कंपनीने कोणतेच पाऊल उचलले नव्हते. फॉक्सवॅगनच्या कारमधून वायू प्रदूषण वाढत असल्याच्या कारणावरुन एनजीटीने हा निर्णय घेतला आहे.
फॉक्सवॅगन कंपनीने आपल्या डिझेल कारमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी प्रदूषण तपासणीच्या आकड्यांमध्ये फेरफार होईल, अशा चीपचा वापर केल्याचा आरोप आहे. कंपनीने २००८ ते २०१५ दरम्यान १.११ कोटी कारमध्ये हे उपकरण लावल्याचे वर्ष २०१५ मध्ये पहिल्यांदा मान्य केले होते. या सर्व कार्स जगभरातून विकली गेली होती.
या उपकरणाच्या मदतीने कारमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या आकड्यात फेरफार करता येऊ शकते हे प्रयोगशाळेत स्पष्ट झाले. या घोटाळ्यानंतर कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. जर्मनीमध्ये या कंपनीला ८,३०० कोटींचा दंड करण्यात आला आहे.
फॉक्सवॅगनच्या कारमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे भारतात एनजीटीसमोर आल्यानंतर याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर कंपनीने बाजारातील ३.२३ लाख वाहने परत मागवून त्यात नवीन उपकरण लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कंपनीने या कारमध्ये असे उपकरण बसवले की, जे सॉफ्टवेअरच्या मदतीने कार्बन उत्सर्जनच्या आकड्यांमध्ये फेरफार केले जाऊ शकत होते.