समाजामध्ये फूट पाडणारा नेता आम्ही कधीच स्वीकारणार नाही, या शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर संयुक्त जनता दलाचे सरकार बुधवारी बिहारमधील विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. हा ठराव संयुक्त जनता दलाने १२६ विरुद्ध २४ मतांनी जिंकला. या ठरावावर विधानसभेत झालेल्या भाषणांना उत्तर देताना नितीशकुमार यांनी मोदींवर टीका केली.
संयुक्त जनता दल धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कधीही तडजोड करणार नसल्याचे सांगून नितीशकुमार यांनी मोदी यांचा समाजात फूट पाडणारा नेता असा उल्लेख केला. गुजरातच्या विकास मॉडेलवरही त्यांनी हल्ला चढवला.
मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संयुक्त जनता दलाने गेल्या रविवारी भाजपशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलाने बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. नितीशकुमारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विश्वासघात केल्याची टीका करीत भाजपच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहातून सभात्याग केला.