बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी नितीश कुमार सज्ज झाले असून येत्या शुक्रवारी पाटण्यात होणाऱया शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील निमंत्रित केले आहे. कुमार यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना दुरध्वनीवरून संपर्क करून त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले छटपुजेचे पर्व आज सकाळी संपल्यानंतर कुमार यांनी काही महत्त्वाच्या नेत्यांना दूरध्वनी करून शुक्रवारी पाटण्याच्या गांधी मैदानात होणाऱया शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देऊ केले. नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देऊन पक्षाने शिष्टाचार पाळला आहे. आता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचे की नाही हे मोदींवर आहे, असे ‘जदयु’चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितले. दरम्यान, मोदींचे कार्यक्रम अगोदरच निश्चित झालेले असल्याने नितीश कुमार यांच्या शपथविधीला ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय मायुख यांनी सांगितले.