बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाने शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) घटक पक्ष होण्याचा ठराव पारित केला.

पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी याबाबतची घोषणा केली, मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्याशी मतभेद झाल्याने पक्षात फूट पडल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये रालोआचा घटक पक्ष होण्याचा ठराव पारित करण्यात आला. बिहारमधील महाआघाडीमधून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे त्यागी म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीशकुमार यांना रालोआचा घटक पक्ष होण्याची विनंती केली होती. ती कार्यकारिणीने मान्य केली आणि आता संयुक्त जनता दल हा रालोआचा घटक पक्ष झाला आहे, असेही त्यागी यांनी सांगितले. पक्षांत फूट पडली असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.

राज्यातील २० पैकी १६ विभाग अध्यक्ष, ७१ आमदार आणि ३० आमदार (विधान परिषद) त्याचप्रमाणे पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या शरद यादव यांच्याशी चर्चा करून करण्यात आल्या होत्या. आणि त्यांनी वरील निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ही बाब समोर असताना पक्षात फूट पडली आहे असे म्हणता येईल का, असा सवालही त्यागी यांनी केला. शरद यादव या बैठकीला गैरहजर होते आणि ते आपल्या समर्थकांसह ‘जन अदालत’ या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

जनता दल संयुक्तच्या दोन गटात धुमश्चक्री

बिहारमध्ये जनता दल संयुक्तच्या नितीश कुमार व शरद यादव गटांच्या समर्थकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर तुंबळ धुमश्चक्री झाली. यादव यांचे समर्थक दुचाकीवर विमानतळापासून ते एस.के.मेमोरियल हॉलपर्यंतच्या मार्गावर त्यांच्यासमवेत होते. त्या वेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना त्यांना अडवण्यात आले, त्यामुळे घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्यापैकी काहींनी काठय़ा व पट्टे घेऊन नितीशकुमार यांच्या १ अॅन मार्ग या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निवासस्थान राजभवनच्यासमोर आहे. नंतर नितीश कुमार यांचे समर्थक राष्ट्रीय कार्यकारी समिती बैठकीसाठी तेथे जमलेले असताना ते बाहेर आले व त्यांनी शरद यादव समर्थकांचा पाठलाग केला. यादव हे निलंबित खासदार अली अन्वर यांच्यासह मोटारीत बसलेले होते . त्यांनी या धुमश्चक्रीवर काही प्रतिक्रिया दिली नाही. मी कार्यक्रमात याबाबत बोलेन असे ते म्हणाले. पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज हे नंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, या प्रकाराची चौकशी करून दोषी व्यक्तींना शिक्षा केली जाईल असे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण बघितले जाईल व धुमश्चक्रीमागे नेमके कोण होते हे शोधून काढले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यादव यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरू न जाण्याची परवानगी का दिली, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, चौकशीत याचा विचार केला जाणार आहे. जनता दल संयुक्तच्या कुमार व यादव गटांचे मेळावे या वेळी झाले. जनता दल संयुक्तच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली व विरोधी गटाने एस.के.मेमोरियल हॉल येथे जन अदालतीचे आयोजन केले होते.  यादव व अली अन्वर तसेच निलंबित मंत्री रमाणीराम यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

बिहारमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल – शहा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाने रालोआचा घटक पक्ष होण्याचा ठराव पारित केला त्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले आहे. यामुळे बिहारमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असे शहा यांनी म्हटले आहे. संयुक्त जनता दलाच्या निर्णयामुळे केवळ रालोआलाच बळकटी मिळणार नाही तर बिहारमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असे ते म्हणाले.