आज आपण प्रदूषणाच्या समस्येवर मोठय़ा प्रमाणात चर्चा करतो पण हे प्रदूषण नेमके कधी सुरू झाले असावे याबाबत नवीन माहिती संशोधनात हाती आली असून सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी शिशामुळे पर्यावरणाचे प्रदूषण झाले होते असे दिसून आले आहे. पीटसबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांना मानवाने केलेल्या शिशाच्या प्रदूषणाचे पुरावे मिशिगनच्या अतिउत्तरकडे मिळाले आहेत. खाणीतून व इतर मानवी कृतींमुळे होणारे धातूंचे प्रदूषण त्या काळातही युरोप, आशिया व दक्षिण अमेरिकेत अधिक होते, असे स्पष्ट झाले.
भूगर्भशास्त्र व ग्रहविज्ञान विभागातील पीएच.डी संशोधक डेव्हिड पॉम्पियानी यांनी असे म्हटले आहे की, तळी किंवा सरोवरातील खडकांचा अभ्यास करून मूळ निवासी अमेरिकी लोकांचा पर्यावरणावर पडलेला प्रभाव तपासता आला. ग्रेट लेक्सच्या पुरातत्त्वशास्त्रीय नोंदी व पर्यावरण इतिहास यातून स्पष्ट होत आहे हे या संशोधनाचे महत्त्व आहे. मिशिगनच्या केवीनॉ द्वीपकल्पाची तपासणी संशोधकांनी केली. कारण उत्तर अमेरिकेत तांब्याचा तो मोठा स्रोत होता. इ.स १८०० च्या सुमारास जी सर्वेक्षणे करण्यात आली त्यात इतिहासपूर्वकालीन काळात खाणकाम होते असे दिसून आले. त्यात वापरली जाणारी साधनेही मिळाली आहेत. खाणींच्या खड्डय़ांजवळच्या तीन तलावातील खडक जून २०१० मध्ये गोळा करण्यात आले होते, त्याच्या आधारे तांब्याचे खाणकाम केव्हा झाले व त्यामुळे प्रदूषण कसे होत गेले याचा मागोवा घेण्यात आला. खडकांच्या नमुन्यात शिसे, टिटॅनियम, मँग्नेशियम, लोह, सेंद्रिय पदार्थ यांचा अंश दिसून आला. त्यात विशेष म्हणजे शिशाचे प्रदूषण दहा हजार वर्षे टिकून राहिले आहे. केवीनॉ द्वीपकल्पात आठ हजार वर्षांपूर्वी तांब्याच्या खाणकामामुळे हे प्रदूषण घडून आले असे पॉम्पियानी यांनी म्हटले आहे. आशिया, युरोप व दक्षिण अमेरिका या भागातील शिशाच्या प्रदूषणाचे तीन हजार वर्षांपूर्वीपर्यंतचे पुरावे सापडले आहेत. एनव्हिरॉनमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.