करोना व्हायरसवर लसचं प्रभावी ठरु शकते. ही लस उपलब्ध झाली तर परिस्थिती पुन्हा सामान्य होईल असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस बुधवारी म्हणाले. वर्ष संपण्याआधी ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“करोना व्हायरसच्या संकटावर सुरक्षित आणि प्रभावी लस हा एकमेव मार्ग आहे. अशी लस तयार झाली तरच जग पूर्वपदावर येईल, सर्वकाही सुरळीत सुरु होईल. लाखो लोकांचे जीव आणि पैसा दोन्ही वाचेल” असे अँटोनियो गुट्रेस व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन आफ्रिकन देशांशी संवाद साधताना म्हणाले.

“मानवतेच्या दृष्टीकोनातून करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी २५ मार्च रोजी मी दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सची देणगी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले होते. त्यातील फक्त २० टक्के रक्कम आतापर्यंत जमा झाली आहे” असे अँटोनियो गुट्रेस म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राने ४७ आफ्रिकन देशांना COVID-19 चाचणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. लाखो लोक या व्हायरसमुळे बाधित झाले असून सर्व अर्थव्यवहार ठप्प आहेत. आतापर्यंत हजारो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचे मोठे संकट समोर आहे.