कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपलं नशीब आजमावण्यासाठी वेगवगळ्या पक्षाचे उमेदवार सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात व्यस्त आहे. याचरदम्यान, एका अशा उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे, ज्याने आपली संपत्ती ३३९ कोटी असल्याचं जाहीर केलं आहे. हा उमेदवार आहे पी अनिल कुमार, जे अपक्ष लढत आहेत. विशेष म्हणजे पी अनिल कुमार चहा विकायचे आणि त्यातूनच त्यांनी इतकी मोठी संपत्ती उभी केली आहे.

पी अनिल कुमार यांनी आपल्याकडे १६ कार, १७ दुचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी, टँकर आणि ४८ एकर जमीन असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यांनी फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जन्म केरळमध्ये झाला. गरिबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. जेव्हा ते ९ वर्षांचे होते तेव्हा मुंबईला आले आणि दोन वर्षांनी परतले. आपल्या व्यवसायाबद्दल विचारलं असता, आपण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चहा विकायचो, ज्यामधून १४ -१५ वर्षात चार लाख रुपये कमावले असं त्यांनी सांगितलं. यानंतर ते केरळला गेले आणि लग्न केलं. लग्नाच्या काही वेळानंतर ते पुन्हा बंगळुरुला परतले आणि चहाची दुकानं सुरु केली. याशिवाय त्यांनी एमजे इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड बिल्डर्स नावाने कंपनी सुरु करत जमीन व्यवहार सुरु केला, ज्यामुळे त्यांना प्रचंड फायदा झाला.

३३९ कोटींच्या संपत्तीसोबत पी अनिल कुमार सर्वात श्रीमंत अपक्ष उमेदवार ठरले आहेत. पी अनिल कुमार यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांनी नकार दिल्याने अपक्ष लढायचं ठरवलं. पी अनिल कुमार बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. आपल्या विजयाची त्यांना खात्री आहे. या जागेवर भाजपाचे सतीश रेड्डी आमदार आहेत. भाजपाने पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसने महिला उमेदवार राजगोपाल रेड्डी यांना संधी दिली आहे. कर्नाटकात १२ मे रोजी विधानसभेच्या २२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.