प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्र सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे नागरी पुरस्कार जाहीर केले. पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला, तर माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला.

महाराष्ट्रातील १३ मान्यवरांना नागरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे आणि मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्यासह १२ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत.

एकूण १४१ जणांना नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांत सात जणांना पद्मविभूषण, १६ जणांना पद्मभूषण आणि ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. तर १८ मान्यवर परदेशी किंवा अनिवासी भारतीय आहेत. त्याचबरोबर १२ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष अनिरुद जगनॉथ, ऑलिंपिक पदविजेती मुष्ठियोद्धा मेरी कोम, ज्येष्ठ शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा, आध्यात्मिक गुरू श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांचा, तर पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांत गायक अजय चक्रवर्ती, वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मान्यवर

उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर ग्रामविकासात आदर्श कार्य करणारे पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे, क्रिकेटपटू झहीर खान, वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर, मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई, अभिनेत्री कंगणा रणौत, चित्रपटनिर्माता करण जोहर, निर्माती एकता कपूर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, अभिनेत्री सरिता जोशी, गायक अदनान सामी, डॉ. सॅण्ड्रा डेसा सुझा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सात मान्यवरांचा  सन्मान..

देशातील दुसऱ्या क्रमाकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण सात मान्यवरांना जाहीर करण्यात आला. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस (मरणोत्तर), माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (मरणोत्तर), अनिरुद्ध जगन्नाथ (मॉरिशस), मुष्ठीयोद्धा मेरी कोम, शास्त्रीय गायक चन्नूलाल मिश्रा, आणि अध्यात्मिक गुरू विश्वेशतीर्थ स्वामीजी (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील विजेते ऑलिंपिक पदकविजेती मेरी कोम हिला पद्मविभूषण, तर बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पद्मभूषण आणि क्रिकेटपटू जहीर खान याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.