अमेरिकेला मुदतीत प्रस्ताव न दिल्याने बाजारभावाने मिळण्याची शक्यताही मावळली
पाकिस्तानला लष्करी मदत म्हणून एफ १६ विमाने देण्यास अमेरिकेने नकार दिला होता तरी ती विमाने बाजारभावाने विकत घेण्याचा प्रस्ताव खुला होता पण पाकिस्तानने ही विमाने खरेदीसाठी २४ मे या मुदतीपर्यंत प्रस्ताव न दिल्याने आता पाकिस्तानला ही विमाने बाजारभावानेही मिळण्याची शक्यता मावळली आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला ७० कोटी डॉलर्सची आठ एफ १६ विमाने देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ही विमाने लष्करी मदत म्हणून देण्यास ओबामा प्रशासनाला अमेरिकी काँग्रेसमध्ये बराच विरोध झाल्याने अखेर लष्करी मदत म्हणून ही विमाने देण्याचा प्रस्ताव रद्द करावा लागला होता. तरीही अमेरिकेने ही विमाने पाकिस्तानला बाजारभावाने देण्याची तयारी दर्शवली होती पण त्यासाठी विहित मुदतीत मागणी नोंदवणे गरजेचे होते त्यासाठी २४ मे ही मुदत होती ती आता उलटून गेली आहे त्यामुळे पाकिस्तानला आता ही विमाने मिळणार नाहीत असे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे. पाकिस्तानने राष्ट्रीय निधीतून ही विमाने विकत घेण्यास तयारी दाखवली नाही असा याचा अर्थ आहे. पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत जलील अब्बास जिलानी यांनी सांगितले की, अजून या प्रस्तावाची मुदत संपलेली नाही. सुरुवातीला ७० कोटी डॉलर्सना एफ १६ विमाने पाकिस्तानला लष्करी मदत म्हणून देण्याचे ठरले होते. पण अमेरिकी काँग्रेसने या विमानांसाठी करदात्यांचा पैसा वापरण्यास नकार दिला होता त्यामुळे अनुदानित दराने ही विमाने पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आधीच निकाली निघाली आहे. हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात आलेले अपयश व पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबाबत भीती यामुळे पाकिस्तानला ही विमाने नाकारण्यात आली होती. पाकिस्तानला अनुदानित दराने म्हणजे २७ कोटी डॉलर्स दराने ही विमाने दिली जाणार होती पण अखेर अमेरिकी प्रशासनाने पाकिस्तानला या विमानांची पूर्ण किंमत देण्यास सांगितले, ते पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मान्य केले नाही. पाकिस्तानी हवाई दलास दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या नावाखाली ही विमाने सवलतीच्या दरात देण्याचा ओबामा प्रशासनाचा इरादा होता.