PoK अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे पाकिस्तानने मुळीच विसरु नये. पूर्वीही पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आताही आहे आणि यापुढेही असेल असं म्हणत भारताचे संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. बिहारच्या मुझ्झफरपूर या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाल्टिस्तानमध्ये ज्या कारवाया पाकिस्तान करतो आहे त्या पाकिस्तानने थांबवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानने हे लक्षात घेतलं पाहिजे पीओके हा भारताचाच भाग आहे. आमच्या संसदेचा हा प्रस्ताव आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. पीओकेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही हे सांगत पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. दरम्यान इम्रान खान सरकार या प्रांतात विधानसभा निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे. चीनचं कर्ज आणि दबावानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरुन भारताने पाकिस्तानवर टीका केली होती. आता आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला ठणकावत इशारा दिला आहे.