उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबाने निकाह आमंत्रण पत्रिकेवर प्रभू रामचंद्र आणि सीतेचा फोटो छापत जातीय सलोखा आणि दुसऱ्या धर्माचा आदर करायला शिकवणारं एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. सुलतानपूर येथील बघसराई गावातील रहिवासी असलेले मोहम्मद सलीम यांनी घेतलेल्या या निर्णयाचं प्रचंड कौतूक होत आहे.

मोहम्मद सलीम यांची मुलगी जहाना बानो हिचा लवकरच निकाह होणार आहे. सलीम यांनी आपल्या हिंदू मित्रांना पाठवलेल्या आमंत्रण पत्रिकेवर राम आणि सीतेचा फोटो छापला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोत हिंदू पुजाही दाखवण्यात आली आहे. फोटोत कलश, केळीची पाने तसंच पुजेची थाळीही दाखवण्यात आली आहे.

जेव्हा सलीम यांनी आपल्या मित्रांना आमंत्रण पत्रिका दिली तेव्हा त्यांचासाठीही तो आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. मुस्लिम समाजातील लोकांनाही सकारात्मकतेने सलीम यांच्या निर्णयाचं स्वागत केलं असून त्यांचं अभिनंदन केलं आहे.

‘हिंदू आणि मुस्लिमांमध्ये असलेलं अंतर कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे माझ्या हिंदू मित्रांसाठी मी केलं आहे, ज्यांच्या मनात माझ्या धर्माबद्दल आदर आहेत. जर आम्ही त्यांच्या धर्म आणि धार्मिक गोष्टींचा आदर केला तर तेही नक्कीच मुस्लिम धर्माचा आदर करु लागतील’, असं सलीम यांनी सांगितलं आहे.

सलीम यांचे शेजारी राधेश्याम तिवारी यांनी सांगितलं आहे की, ‘राम आणि सीतेचा फोटो छापून सलीम भाईंनी मुस्लिम हिंदू धर्माचा किती आदर करतात हे दाखवून दिलं आहे. मुस्लिम धर्मातील कोणीही त्यांच्या या निर्णयाला विरोध केलेला नाही. हे खूपच कौतुकास्पद आहे’.