राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एका मोठ्या निर्णयाची रविवारी घोषणा केली. भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरीत करण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली

अनेक वर्षांपासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखळी जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची ६७ एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहिल, असा आदेश याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच रामजन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्याने ही सर्व जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. “या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल” असे मोदींनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले, भारताची ओळख ही कधीही त्यावर कोणी राज्य केलं किंवा कोणी ते गमावलं यावर झालेली नाही. तर इथल्या लोकांची संस्कृती आणि पंरपरा यांच्यामुळेच या देशाची ओळख आहे. यावेळी मोदींनी देशातील पहिल्या दिवसरात्र चालणाऱ्या ‘महाकाल एक्स्प्रेस’ या खासगी रेल्वेचे उद्घाटन केले. ही रेल्वे उत्तर भारतातील वारणसी, उज्जैन आणि ओंमकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंगाना जोडते.