योगसाधना केवळ शरीराचा व्यायाम नसून, मनुष्याच्या आंतरिक विकासासाठी योगसाधना आवश्यक आहे. ते तणावमुक्ती आणि शांततेचेही साधन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये केले. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजधानी नवी दिल्लीतील ३५ हजार लोकांनी रविवारी सकाळी ३५ मिनिटे विविध योगासने केली. राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे राजपथाचे रुपांतर योगपथात झाले होते. विविध केंद्रीय मंत्री, अनेक शाळकरी मुलेही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
योगासनाच्या कार्यक्रमापूर्वी आपले विचार मांडताना मोदी म्हणाले, विकासाचे नवे नवे टप्पे पादाक्रांत केले जात आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडताहेत. पण या सर्वामध्ये माणूस तिथेच राहिला आहे, असे व्हायला नको. तसे झाले तर ते संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक असेल. योगसाधनेमुळे मनुष्याचा आंतरिक विकास होतो. ते केवळ शरीराचे व्यायामप्रकार नाहीत. मन, बुद्धी, शरीर आणि आत्मा हे सगळे संतुलित करण्यासाठी योगसाधनेची भूमिका महत्त्वाची आहे.
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिवस जाहीर केल्याबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे त्याचबरोबर या ठरावाला पाठिंबा देणाऱया १९३ देशांचे आभार मानले. आज सूर्याची पहिली किरणे जिथे उगवतात तेथपासून ते सूर्याची शेवटच्या किरणांपर्यंत जगातील सर्व देशांमध्ये योगसाधना केली जाईल, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. योगसाधना पुढे घेऊन जाणाऱया ऋषी-मुनींचे, योगशिक्षकांचे, योगगुरूंचे त्यांनी आभार मानले