विरोधक म्हणजे अंधार आहेत आणि त्यातून प्रकाशाकडे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमती पाहिल्या तर मोदींनी देशाला महागाईच्या अंधारात ढकलले आहे असेच दिसते आहे अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जी आश्वासने दिली होती त्याचा त्यांना साफ विसर पडला आहे अशीही टीका ओवेसी यांनी केली.

सध्या पेट्रोलचे दर ८५ रुपयांच्या घरात आहेत. तर डिझेलचे दरही ७५ रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त आहेत. या वाढत्या दरांवर सरकारचे नियंत्रण नाही असे भाजपाने म्हटले आहे. अशात काँग्रेसनेही देशभरात बंद पुकारला होता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यापाठोपाठ आता एआयएमआयएम चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदींना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे म्हटले आहे. तसेच देशाला महागाईचा अंधार निर्माण केल्याचीही टीका केली आहे.