बंगळूरु : ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आल्याचे मंगळुरूचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी गुरुवारी सांगितले. मंगळुरू दक्षिण उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त टी. कोदंडराम हे या पथकाचे नेतृत्व करतील.

आम्ही शवचिकित्सा अहवालाची वाट पाहात असून, त्यातून मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे पाटील यांनी मंगळुरू येथे पत्रकारांना सांगितले. यापूर्वी बंगळूरुला रवाना झालेल्या एका पोलीस पथकाने कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी केली असून त्यांना बरीच माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्येही आम्ही आणखी इतर काही लोकांची चौकशी करू, असे पाटील म्हणाले.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाइल फोनचे पोलीस विश्लेषण करत आहेत. यापैकी एक फोन सिद्धार्थ यांच्याजवळ, तर दुसरा त्यांच्या मोटारीत आढळला होता. माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई असलेले सिद्धार्थ हे दक्षिण कन्नड जिल्ह्य़ातील उलाला येथील नेत्रावती नदीच्या पुलावरून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होते. ३६ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.