मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कालावधी उलटून गेल्यानंतर राखीव मतदान यंत्र (इव्हीएम) मुख्यलयात पोहोचल्याने काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, या भोंगळ कारभाराबद्दल एका नायब तहसिलदाराचे निलंबन करण्यात आले आहे.

मतदानानंतर ४८ तासांनंतर सागर मुख्यालयात शनिवारी राखीव इव्हीएम पोहोचले. दरम्यान, इथल्या स्ट्राँग रुममध्ये दोन तासांहून अधिक काळासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. यावरुन काँग्रेस आणि इतर पक्षांनी जोरदार गोंधळ घातला. यावर मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी कांताराव यांनी सर्व मतदान यंत्रे सुरक्षित आणि सीलबंद आहेत, असे सांगत मतदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मतदान यंत्रे उशीरा पोहोचल्याने सागरचे नायब तहसिलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

खुरईहून सागर या जिल्ह्याच्या ठिकाणी ३७ राखीव इव्हीएम पाठवण्यात आली होती. या दोन शहरांमधील अंतर २५ किमी असून एका स्कूलबस मधून ही मतदान यंत्रे पाठवण्यात आली होती. मात्र, हे अंतर कापण्यासाठी या बसला तब्बल दोन दिवस लागले. या बसवर कोणताही नोंदणी क्रमांकही नव्हता.

खुरईमध्ये गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांना मोठी टक्कर देणाऱ्या काँग्रेस आमदार अरुणोदय दुबे म्हणाले, इव्हीएम पोहोचण्यास उशीर आणि बसवर नोंदणी क्रमांक नसल्याने संशय निर्माण होत आहे. भाजपा बेकायदा पद्धतीने निवडणूक यंत्रणेचा उपयोग करीत असून या गंभीर प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.