टांझानियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आय-पॅक’चा वाटा
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना चकित करणारे ‘निवडणूक व्यवस्थापन गुरू’ प्रशांत किशोर यांची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या टांझानियात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले जॉन मॅगफली यांच्या प्रचाराची जबाबादरी प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ संस्थेने उचलल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तब्बल वीस लाख साठ लाख मतदारांपर्यंत थेट प्रचार करण्यात आला. प्रशांत किशोर यांच्या ‘इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय-पॅक)’ या संस्थेचा लौकिक आता परदेशातदेखील झाला आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर एका निवडणुकीचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट या संस्थेला मिळणार असल्याचा दावा सूत्रांनी केला.
उमेदवाराचे प्रतिमासंवर्धन (इमेज बिल्डिंग), धारणानिर्मिती (पर्सेशन), आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व मोठय़ा प्रमाणावर थेट जनसंपर्क या सूत्रांवर आम्ही काम करीत असल्याचे आय-पॅक या संस्थेच्या एका सदस्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत याच तंत्राचा वापर करण्यात आला. विरोधी पक्षाच्या रणनीतीचा अभ्यास करून आम्ही नियोजन करतो. त्याची सारी सूत्रे प्रशांत किशोर यांच्याच हाती असतात. आय-पॅक संस्थेमध्ये आयआयटी, आयआयएम तसेच परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते.
काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते कॅप्टन अमरिंदर यांच्या प्रचाराची जबाबदारी या संस्थेला मिळाली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ही संस्था प्रचार करेल. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाल्याचा दावा सूत्रांनी केला. राजकारण, सरकारी धोरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांमधून उमेदवार शोधले जात आहेत. पीआरएस लेजिस्लेटिव्ह या संस्थेमार्फत ‘फेलो’ म्हणून विविध खासदारांकडे काम करणाऱ्या तरुणांना या संस्थेच्या वतीने लाखो रुपयांचे पॅकेज दिले जात आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरात कोणती ना कोणती निवडणूक दरवर्षी होत असते. त्यामुळे हा बारमाही चालणारा व्यवसाय असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशांत किशोर यांचा मोदींच्या विजयात मोलाचा वाटा होता. परंतु सत्तास्थापनेनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मोदी यांनी त्यांना दूर केले. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर भाजपला वरचढ ठरले.
नितीशकुमारांचे सल्लागार
पाटणा: प्रशांत किशोर यांची मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी यासाठी मुख्यमंत्र्यांना सल्लागाराची भूमिका ते बजावतील असे स्पष्ट करण्यात आले. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असेल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2016 रोजी प्रकाशित
प्रशांत किशोर यांची ख्याती परदेशात!
टांझानियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आय-पॅक’चा वाटा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-01-2016 at 02:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor is famous in foreign