राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे प्रतिपादन; लोकप्रतिनिधींना जनमताचा आदर करण्याचा सल्ला
‘आपल्या देशाला लोकशाहीची उदात्त परंपरा लाभली आहे. देशातील सर्व नागरिकांना न्याय, समानता आणि आर्थिक समता मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. परंतु हिंसाचाराच्या घटना जेव्हा घडतात त्यावेळी या लोकशाही मूल्यांवर आघात होतो. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. हिंसा, असहिष्णुता व विवेकशून्य शक्तींपासून आपण आपले रक्षण करणे आवश्यक आहे’, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर मतप्रदर्शन केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी असहिष्णुतेबरोबरच दहशतवाद, शांतता प्रक्रिया, लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आदी मुद्दय़ांचा उहापोह केला.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान लोकप्रतिनिधींना जनमताचा आदर करण्याचा सल्ला दिला. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संवादप्रक्रिया बंद पडल्याने संसदेचे कामकाज गदारोळात पार पडते. त्यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके प्रलंबित राहतात. हाच धागा पकडून राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात लोकप्रतिनिधींना सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले की, ‘संसदेत विधायक चर्चा होणे अपेक्षित आहे. कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सर्वसहमती, सहकार्य आणि परस्परांच्या मतांचा आदर महत्त्वाचे असतात. हेच जर नसेल तर निर्णयप्रक्रिया लांबते व त्याचा परिणाम विकासप्रक्रियेवर होतो. हे टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परस्परसंवाद वाढवून जनमताचा आदर राखणे गरजेचे आहे.’

दहशतवाद हा कर्करोग

दहशतवाद्यांनी छेडलेली सिद्धान्तविहीन लढाई कर्करोगासारखी आहे, ज्याचा इलाज तीक्ष्ण सुरीनेच करावा लागेल. चांगले अथवा वाईट असे दहशतवादाचे रूप नसते. तो वाईटच असतो, असे मुखर्जी म्हणाले.

.. तोवर चर्चा अशक्यच
पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपतींनी पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले. पाकिस्तान एकीकडे शांततेबाबत चर्चा करत असताना सीमेवर गोळीबार केला जातो. सीमेपलीकडून दहशतवादी पाठवले जातात. अशा परिस्थितीत गोळ्यांच्या वर्षांवादरम्यान शांततेच्या चर्चा कशा काय घडणार, असा सवाल राष्ट्रपतींनी उपस्थित केला.

देशातील प्रत्येक गोष्टीवर
मतैक्य होणे शक्य नाही; परंतु सद्य:कालीन आव्हान थेट आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. दहशतवादी सीमांचे बंधन झुगारून स्थैर्याच्या संकल्पनेलाच सुरुंग लावू पाहत आहेत. जर गुन्हेगारच सीमांची बंधने तोडण्यात यशस्वी झाले, तर सगळीकडे अराजकतेचे युग अवतरेल.
प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती