आजपासून ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने ओडिशामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते शहरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भुवनेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. लाल कृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली अमित शहा हे सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला हजर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भाजपमध्ये सध्या आत्मविश्वास असून पुढील काळात देखील असेच यश संपादन करू असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्याबरोबरच राज्याच्या निवडणुका देखील या काळात होणार आहेत. विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही जिंकू असा विश्वास भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये नुकताच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.

बिजू जनता दलाला जिल्हा परिषदेच्या ४७३ जागांवर विजय मिळाला आहे तर भारतीय जनता पक्षाला २९७ जागांवर यश मिळाले आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप द्वितीय स्थानावर आला आहे. याचा संदर्भ घेऊन व्यंकय्या नायडू म्हणाले आम्ही येत्या काळात पश्चिम बंगाल आणि ओडिशा या भागात निश्चितच विजय मिळवू. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका जिंकू असे ते म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचा उद्देश कल्याणकारी योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणे हा आहे असे ते म्हणाले.