स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहराने आता स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या बाबतीतही बाजी मारली आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत ए वन विभागात टॉप टेनमध्ये पुण्याने स्थान मिळविले आहे. विशाखापट्टणम पहिल्या स्थानी असून पुणे नवव्या क्रमांकावर आहे. याबरोबरच ए विभागात महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बडनेरा यांचाही समावेश असून ते अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.
मागील वर्षी या यादीमध्ये पुणे ७५ व्या क्रमांकावर होते. मात्र एका वर्षात शहराने टॉप टेनमध्ये नाव पटकाविले आहे. एकीकडे शहरातील वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातून आणि देशभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, असे असूनही पुणे स्टेशनने टॉप टेनमध्ये मिळविलेले अव्वल स्थान पुणेकरांसाठी आणि राज्यासाठीही अभिमानाची बाब आहे. आयआरसीटीसीकडून देशातील सर्व रेल्वे स्टेशनचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४०७ स्टेशनमधून टॉप टेन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली असल्याचे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
यामध्येही विभाग ए वन आणि ए अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यातील ए वन या विभागात पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तवी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनऊ अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बॅंगलोर यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील वांद्रे १५ व्या क्रमांकावर आहे.
याशिवाय ए विभागात बियास, खम्माम, अहमदनगर, दुर्गापूर, मंचेरीयल, बडनेरा, रंगिया, वर्णागळ, दामोह आणि भूज हे टॉप टेनमध्ये आहेत. याबरोबरच लोणावळा २९ व्या तर विभागीय क्रमवारीमध्ये सोलापूर १३ व्या स्थानावर आहे. याबरोबरच अस्वच्छ स्टेशनची यादीही तयार करण्यात आली असून दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅंट सर्वात अस्वच्छ स्टेशन असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.