राफेल करारातील कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला असतानाच यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आधी राफेल करारात पैशांची चोरी झाली, आता फाईल चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, मात्र, चोरी उघडकीस आणणाऱ्या माध्यमांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. याला‘अंधेर नगरी, चौपट राजा’ म्हणतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

राफेल कराराविरोधातील बातम्यांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडत असतानाच, या कराराची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी केला. ‘हिंदू’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या या त्याच कागदपत्रांवर आधारित असून हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे, असाही पवित्रा सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला.

“सध्या एक नवीन ओळ प्रसिद्ध झाली आहे. गायब झाले. २ कोटी तरुणांचा रोजगार, शेतकऱ्यांकडील शेतमालाला योग्य भाव, बँक खात्यात जमा होणारे १५ लाख रुपये गायब झाले होते. आता राफेल करारातील फाईल देखील गायब झाल्या आहेत”, असा चिमटा राहुल गांधी यांनी काढला. या सरकारचे फक्त एकच काम आहे ते म्हणजे चौकीदाराला वाचवणे. जर राफेल करारातील कागदपत्रे गायब झाली आहेत, तर ती कागदपत्रे खरी होती हे स्पष्ट होते आणि हे तुम्हीच मान्य करत आहात, असे राहुल गांधींनी सांगितले.

कागदपत्रे गायब झाल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे, पण या कागदपत्रांवर ज्यांची नावे होती, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट गायब करणे हे या सरकारचे कामच आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. राफेल विमान भारतीय हवाई दलात दाखल होण्यास मोदींमुळेच विलंब झाला. मोदींना मित्राच्या खिशात ३० हजार कोटी रुपये टाकायचे होते. या करारात पंतप्रधान कार्यालयामार्फत राफेल विमान तयार करणाऱ्या कंपनीशी समांतर चर्चा का झाली, कारण मोदींना त्यांच्या मित्राला ३० हजार कोटी रुपये द्यायचे होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भारतात पंतप्रधानांचा विरोध करणाऱ्या सर्वांची चौकशी होऊ शकते. पण जेव्हा पंतप्रधानांचे नाव येते, त्यावेळी त्यांची चौकशी मात्र होत नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.