देशात करोनानं पाऊल ठेवल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. २१ दिवसांच्या या लॉकडाउननंतर त्यात वाढ करण्यात आली. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. २१ दिवसांच्या काळात करोनाला नष्ट करू, असं मोदी लॉकडाउनची घोषणा करताना म्हणाले होते. याच आश्वासनावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “अचानक करण्यात आलेला लॉकडाउन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला,”अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ कार्यक्रमातून मोदी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आहे. “अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत करोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग,” असं म्हणत राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

आणखी वाचा- देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ४३ लाखांचा टप्पा; ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

व्हिडीओत राहुल गांधी काय म्हणाले?

“करोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटित क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. सुक्ष्म आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाउन केलं, तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं. पंतप्रधानांनी सांगितलं की २१ दिवसांची लढाई असेल, पण असंघटित क्षेत्राचा मणकाच २१ दिवसात तुटला. लॉकडाउननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेस एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण नाही केलं. काँग्रेस सांगितलं की, सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशाशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारनं काहीच केलं नाही. उलट सरकारनं सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला. लॉकडाउन करोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाउन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासियांना केलं.