राहुल गांधी हे काही प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांसाठी लॉबिंग करीत असल्याचा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. याला रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले आहे.


याप्रकरणी एअरबस विमान निर्मिती कंपनीचा एक ई-मेल समोर आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये राफेल डीलमध्ये अनिल अंबानींना मदत दिल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे मोदींनी अंबानीसाठी दलालाची भुमिका पार पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. जर अंबानींना दहा दिवस आगोदर या संवेदनशील डीलचा निर्णय आपल्याबाजूने होत असल्याचे कळले असेल तर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींवर पलटवार करताना रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधी काही कंपन्यांसाठी लॉबिंग करीत आहेत. कारण ज्या एअरबसची ते माहिती देत आहेत त्याची विश्वसनीयता संशयास्पद आहे. एअरबसच्या ई-मेलची माहिती राहुल गांधींना कुठून मिळाली. युपीएच्या कार्यकाळातच एअरबस प्रकरणात दलालीचे आरोप झाले होते.