काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आता आपण कुणाशी काय संभाषण केलं याचे भास होऊ लागले आहेत अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतल्याचे पाहून बरं वाटलं. पक्ष आणि राजकीय मतभेद दूर ठेवून त्यांनी ही भेट घेतली होती. मात्र त्यावरून ते राजकारण करतील असं वाटलं नव्हतं. मात्र पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राफेल करारावरून जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांना भास होऊ लागले आहेत असेच वाटते आहे असं इराणी यांनी म्हटलं आहे.

राफेल प्रकरणात तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत निष्ठा दाखवावी लागते आहे. तुमच्यावर खूप दबाव आहे हे मी समजू शकतो. नव्या राफेल डीलशी संबंध नाही, नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींला फायदा मिळवून देण्यासाठी हा खेळ केला असे पर्रिकर आपल्याला म्हणाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यांना आता स्मृती इराणींनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी खोटारडे आहेत, खोटं बोलण्याची काँग्रेसी परंपरा पाळत त्यांनी राफेल करारावरून आभासी संभाषण निर्माण केले अशी खोचक टीका स्मृती इराणी यांनी केली.

राहुल गांधींच्या वक्तव्यांनंतर पर्रिकर काय म्हटले?
भारतीय राजकारणामध्ये पक्षातील भेद बाजुला ठेवत प्रतिस्पर्ध्यांना चांगलं आरोग्य चिंतण्याची परंपरा आहे. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला. या वृत्तांनुसार तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केलीत. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी सांगितले.