JNU हिंसाचार प्रकरणातील आरोपी शरजील इमाम याच्या अटकेसाठी पोलिसांनी दिल्ली, मुंबई आणि पाटणा या ठिकाणी छापेमारी केली आहे. एवढंच नाही तर त्याला शोधण्यासाठी पाच पथकंही रवाना झाली आहेत. जेएनयूचे मुख्य प्रॉक्टर धनंजय सिंह यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजीलला 3 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शरजीलने चिथावणी देणारं भाषण करुन विद्यापीठातील वातावरण कलुषित केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंबंधीचा अहवाल जेएनयू्च्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला होता.

शरजील इमामवर भावना भडकवणारे भाषण दिल्याचा आरोप आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलीस शरजील इमामचा शोध घेत आहेत. शनिवारी शरजील इमाम पाटणा येथील सब्जीबागच्या आंदोलनात सहभागी होणार होता. मात्र त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याने तो या आंदोलनात सहभागी झाला नाही. पोलिसांनी जहानाबाद येथे छापेमारी केली होती. मात्र तो पोलिसांना तिकडे सापडला नाही. आता शरजील इमामला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं तैनात केली आहेत. तसेच मुंबई, दिल्ली आणि पाटणा या ठिकाणी छापेमारीही करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही पथकं तैनात केली आहे अशीही माहिती मिळते आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत आम्ही शरजीलच्या अटकेसाठी घेतो आहोत. रविवारीही आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत काही ठिकाणी छापे मारले. मात्र शरजील आमच्या हाती आला नाही. असं जहानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनिष कुमार यांनी स्पष्ट केलं. शरजीलने आयआयटी मुंबईतून शिक्षण घेतलं त्यानंतर जेएनयूच्या इतिहास अध्ययन केंद्रातून पुढचे शिक्षण घेण्यासाठी तो दिल्लीत आला होता.