नमाज पठणानंतर घरी परतणाऱ्या एका मौलवीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रांची येथील नगरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. हल्ला झालेल्या मौलवीच्या सहकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीनुसार, जवळपास १२ जणांनी मौलवीला हिंदू देवतांचं नाव घेण्यास सांगितलं. त्यासाठी मौलवीने नकार दिल्यानंतर त्याला काठ्या आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पण आरोपांत तथ्य आहे की नाही याचा तपास अद्याप सुरू आहे.

तक्रारीनुसार , ५० वर्षांचे अजहर उल इस्लाम हे अगडू गावात रविवारी नमाज पठण करण्यासाठी गेले होते. नमाज पठण झाल्यानंतर ते आणि सहकारी इमरान हे रात्री मोटार सायकलने घरी परतण्याच्या मार्गावर होते. पण अचानक काही अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. तक्रारीनुसार, अज्ञातांनी मौलवीला एका हिंदू देवाचं नाव घेण्यास सांगितलं. त्यावरुन वाद झाला आणि अज्ञातांनी अजहर यांना मारहाण केली. अजहरने घटनास्थळावरुन पळ काढला आणि पोलीस स्थानक गाठले. तर नगरी पोलीस स्थानकाचे राम नारायण सिंह या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्यांना धार्मिक नारा देण्यास सांगितलं, त्यावरुन वाद झाला आणि नंतर मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. सिंह पुढे म्हणाले की , या प्रकरणात अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवाचं नाव न घेतल्यामुळे मारहाण करण्यात आली या आरोपात तथ्य आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अज्ञातांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.