डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहिमला पळवून नेण्याचा कट आखल्याप्रकरणी त्याची मानलेली मुलगी हनीप्रितच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय या प्रकरणात पोलिसांनी हनीप्रितच्या विरोधात लूक आऊट (शोधमोहिम) नोटीसदेखील जारी केली आहे. राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता. या संपूर्ण कटामागे हनीप्रितची महत्त्वाची भूमिका होती. राम रहिमच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने हनीप्रितने हा कट आखला होता.

राम रहिमला परदेशात पळवून नेण्याचे कारस्थान रचल्याप्रकरणी हनीप्रितविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात हनीप्रीत आणि डेरा सच्चा सौदाच्या प्रवक्त्यांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. प्रवक्ते परदेशात पळून जावे, यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणात गुरमित राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारी हनीप्रित सध्या गायब झाली आहे.

गंभीर गुन्हा दाखल झालेली एखादी व्यक्ती देश सोडून पळून जाईल, असा संशय पोलिसांना असल्यास लूक आऊट नोटीस जारी करण्यात येते. यानुसार विमानतळावरील यंत्रणांना संबंधित व्यक्तीची माहिती दिली जाते. संबंधित व्यक्तीने देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडून तिचा ताबा पोलिसांकडे द्यावा, यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात येते.

हनीप्रितला राम रहिमने दत्तक घेतले होते. हनीप्रितचे आधीचे नाव प्रियांका तनेजा होते. राम रहिमने दत्तक घेतल्यावर तिचे नाव हनीप्रित असे ठेवण्यात आले. हनीप्रितने राम रहिमसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणातील पंचकुलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने राम रहिमला हेलिकॉप्टरने रोहतकला नेण्यात आले. यावेळीही हनीप्रित राम रहिमसोबत होती. राम रहिमनंतर डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखपदी हनीप्रितची नेमणूक होण्याची शक्यता आहे. राम रहिमनंतर डेरा सच्चा सौदामध्ये हनीप्रितचा शब्द अंतिम मानला जातो.