रंजन गोगोई यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस आणि बसपाने शेम शेम च्या घोषणा दिल्या. तसंच रंजन गोगोई यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आणि भाजपाचा निषेध नोंदवत सभात्यागही केला. रंजन गोगोईंना राज्यसभेत खासदार करण्यात यावं यासाठी त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली होती. मात्र त्यांनी आज जेव्हा खासदारकीची शपथ घेतली तेव्हा विरोधकांनी खासकरुन काँग्रेस आणि बसपाने शेम शेम च्या घोषणा दिल्या.

दरम्यान रंजन गोगोई यांना राष्ट्रपती पुरस्कृत राज्यसभेसाठी उमेदवारी मिळताच त्यांच्यावर चौफेर टीका झाली. एवढंच नाही तर न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. मदन लोकूर या दोघांनीही त्यांच्यावर टीका केली होती. तर विरोधी पक्षांनीही या प्रकरणी भाजपावर टीका केली होती.

काय म्हटलं होतं कुरियन जोसेफ यांनी?
आपल्या देशात न्यायव्यवस्थेचं एक स्वतंत्र महत्त्व आहे. आपलं राष्ट्र या स्वतंत्र सिद्धांतावरच उभं आहे. मात्र जे पाऊल गोगोई यांनी उचललं त्यामुळे लोकांचा विश्वास ढळला आहे. न्यायाधीशांमध्ये एक वर्ग असाही आहे जो पक्षपाती आहे अशी धारणा गोगोईंच्या एका निर्णयामुळे निर्माण झाली आहे.

न्या. लोकूर यांनी काय म्हटलं होतं?
माजी सरन्यायाधीश गोगोई यांना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. त्यातच त्यांना उमेदवारी मिळणं हे आश्चर्यचकीत करणारं नाही. मात्र, हे अगदीच लवकर झालं हे आश्चर्यकारक आहे. ही बाब न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.

दरम्यान आज राज्यसभेत जेव्हा गोगोई यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा शेम शेमच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच भाजपाचा निषेध नोंदवत काँग्रेस आणि बसपाने सभात्याग केला.