शरद पवार यांचे साखर उद्योगाला बाळकडू

नवी दिल्ली : बीटपासून साखर बनवण्याचा प्रयोग भारतात पूर्वी यशस्वी झाला नाही, पण आता युरोपमध्ये बेल्जियम आणि फ्रान्स या देशांत नवे बियाणे कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे ठरले आहे. पाच महिन्यांत हे पीक गाळपासाठी उपलब्ध होते. हेक्टरी ६०-७० टन उत्पादन मिळते आणि साखरेचा उताराही तब्बल १४ टक्के असतो. आता बीटपासून भारतात साखर उत्पादन करण्याची वेळ आली आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात त्यांनी उसकरी शेतकरी आणि साखर कारखानदारांना आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला नव्या प्रयोगाचे बाळकडू पाजले.

देशातील ४० टक्के शेती क्षेत्र बागायती असून उर्वरित साठ टक्के पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. उस उत्पादकांवर सातत्याने पाण्याचा अतिवापर केल्याचा आरोप होत असतो. धान्य आणि तेलबियांच्या उत्पादनासाठी पाण्याचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे पाण्याच्या कमी वापरातूनच साखर उत्पादन व्हायला हवे. बेल्जियमला भेट देऊन तेथील यशस्वी साखर उत्पादन पद्धतीची माहिती घेणार आहोत.

त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षे भारतात प्रयोग करून ते यशस्वी झाले तर बीटपासून साखर उत्पादनासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागता येईल, असे पवार म्हणाले.

यंदाही ऊस आणि साखर यांचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत दिलेली आहे. पण, उद्योगानेही स्वत आर्थिक सक्षम होण्यासाठी वीजनिर्मिती, इथेनॉलनिर्मितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात उद्योगांना प्रति युनिट आठ रुपयांनी वीज पुरवली जाते. साखर कारखान्यांनी वीजनिर्मिती करून खुल्या बाजारात सात रुपये प्रति युनिटने जरी वीज विकली तरी साखर उद्योगाला फायदा होईल, असा उपाय पवार यांनी सुचवला. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असून आज, सोमवारी देशभर आंदोलन झाले आहे. इंधनात इथेनॉलचा वापर वाढवला पाहिजे. त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतलेला आहे. पण, साखर उद्योगाने इथेनॉल निर्मितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, कल्लाप्पा आवाडे आदी सहकार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

पाण्याच्या कमी वापरातूनच साखर उत्पादन हवे

देशातील ६० टक्के शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. उस उत्पादकांवर सातत्याने पाण्याचा अतिवापर केल्याचा आरोप होत असतो. धान्य आणि तेलबियांच्या उत्पादनासाठी पाण्याचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे पाण्याच्या कमी वापरातूनच साखर उत्पादन व्हायला हवे, असे पवार म्हणाले.

वीज, इथेनॉलनिर्मितीकडे लक्ष देण्याची गरज

ऊस आणि साखर यांचे यंदाही अतिरिक्त उत्पादन झाले आहे. साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत दिलेली आहे. पण, उद्योगानेही स्वत आर्थिक सक्षम होण्यासाठी वीजनिर्मिती, इथेनॉलनिर्मितीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महासंघाच्या वतीने २०१७-१८ साली उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले.

१ देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील पुरस्कार : भीमाशंकर सह. साखर कारखाना, आंबेगाव, पुणे

२ उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना : उतारा : सोनहिरा सह. साखर कारखाना, कडेगाव, सांगली

३ ऊस विकास पुरस्कार : क्रांतीअग्रणी डॉ. बापू लाड सह. साखर कारखाना, पलूस, सांगली आणि पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह. साखर कारखाना, वाळवे, सांगली

४ तांत्रिक पुरस्कार : विघ्नहर सह. साखर कारखाना, जुन्नर, पुणे आणि पांडुरंग सह. साखर कारखाना, माळशिरस, सोलापूर

५ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : सह्य़ाद्री सह. साखर कारखाना, कराड, सातारा

६ सर्वाधिक गाळपासाठीचा पुरस्कार : विठ्ठल शिंदे सह. साखर कारखाना, माढा, सोलापूर

७ सर्वाधिक उतारा : कुंभ केसरी सह. साखर कारखाना, करवीर, कोल्हापूर</p>