नवी दिल्ली : लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने बुधवारी राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली; पण मतदानाच्या वेळी शिवसेनेचे तीनही खासदार गैरहजर राहिले. काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने विधेयकाला विरोध केला असला तरी प्रत्यक्ष मतदान विरोधात न करून एक प्रकारे सत्ताधारी भाजपलाच मदत केल्याचे चित्र निर्माण झाले.

राज्यसभेत शिवसेनेने मतदान न करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य बदल आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी शिवसेनेचे समर्थन केले. या विधेयकासंदर्भात शिवसेनेने प्रश्न विचारले होते, त्याची समर्पक उत्तरे न मिळाल्याने या विधेयकाला समर्थन वा विरोध करणे चुकीचे ठरले असते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांनी नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिल्याने दिल्लीतील काँग्रेसचे नेते कमालीचे नाराज झाले होते. विधेयकाला थेट विरोध करायचा नसेल तर निदान शिवसेनेने लोकसभेत गैरहजर तरी राहायला हवे होते, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात असणारे प्रामुख्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेनेला ‘समज’ देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे समजते.

 आघाडीवर परिणाम नाही!

शिवसेनेच्या लोकसभेतील पाठिंबा देण्याच्या भूमिकेमुळे राज्यातील नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेने राज्यसभेतही विधेयकाला पाठिंबा दिला तर काँग्रेस राज्यातील शिवसेनेच्या आघाडी सरकारचा पाठिंबा कायम ठेवण्याबाबत पुनर्विचार करू शकेल, असा दबाव काँग्रेसकडून आणला गेल्याचेही सांगितले जाते.

राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू असताना बुधवारी दुपारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदाराने, शिवसेना विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली. आघाडीवर कोणता परिणाम होईल, असा प्रतिप्रश्न करून राऊत म्हणाले की, या विधेयकासंदर्भात शिवसेनेने भूमिका मांडलेली आहे. शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष असून स्वत:चे मत मांडण्याचा पक्षाला अधिकार आहे, असे राऊत म्हणाले.

‘आम्ही हेडमास्तर’

या विधेयकाला विरोध कारणारे पाकिस्तानचे समर्थक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. भाजपच्या बैठकीत हाच मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्याचे समजते. या मुद्दय़ावरून राज्यसभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली. या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आणि पाठिंबा देणारे देशभक्त असे सांगितले जात आहे; पण कोणीही शिवसेनेला देशभक्ती शिकवू नये. तुम्ही (भाजप) ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्याचे आम्ही (शिवसेना) हेडमास्तर आहोत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी हे सगळे हेडमास्तर राहिले आहेत, अशी चौफेर फटकेबाजी राऊत यांनी केली. या विधेयकावर धर्माच्या नव्हे तर मानवतेच्या आधारावर चर्चा झाली पाहिजे. निर्वासित आणि घुसखोर यांतील फरक आम्ही जाणतो. देशातील सगळे घुसखोर बाहेर काढणार का, असा सवाल राऊत यांनी केला.