No Confidence Motion in Lok sabha: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असून शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना सभागृहात हजर न राहता तटस्थ राहण्याचा आदेश दिला आहे असंही त्यांनी सांगितलं. जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास शुक्रवारी मतदान होणार आहे.

सत्ताधारी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असून केंद्र सरकारला धोका नसला तरी प्रादेशिक पक्ष कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनादेखील काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत मतदानाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत बोलले आहेत की, ‘अविश्वास ठरावाच्या नावाने जे काही नाटक सुरु आहे, जो काही गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत त्यातून शिवसेनेने बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संसदीय समितीला आपली भूमिका कळवली आहे. देशातील वातावरण सर्वाना माहित आहे. लोकांच्या तीव्र भावनादेखील सर्वांना माहित आहेत. सभागृहात हजर न राहता शिवसेना तटस्थ राहणार आहे. शिवसेना मतदान करणार नाही’.

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्विट करत ‘आज संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. कोणत्याही अडथळ्याविना सविस्तर चर्चा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.