सियाचेनमध्ये देशाच्या सुरक्षेत तैनात असताना शहीद झालेले भारतीय सैन्यातील लान्स नायक हणमंतप्पा यांच्या पत्नीने आपल्या मुलीलाही सैन्यात पाठविण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. मला मुलगा नाही, परंतु मला इतकी गोड मुलगी असल्यामुळे त्याचा पश्चाताप वाटत नाही. मला तिला कणखरपणे वाढवायचे आहे जेणेकरून ती मोठी झाल्यानंतर भारतीय सैन्यात जाईल. तिच्या शूर वडिलांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे हणमंतप्पांची वीरपत्नी महादेवी यांनी सांगितले. त्या शुक्रवारी नागपूर येथे युवा जागरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी हणमंतप्पांची आई बसम्मा, दोन वर्षांची कन्या नेत्रा आणि भाऊ शंकर गौडा हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात हणमंतप्पांच्या मुलीच्या शिक्षणासाठी महादेवी यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला.
माझ्या पतीला सुरुवातीपासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. पोलिसात निवड झाली; पण त्यांनी नोकरी स्वीकारली नाही. त्यांना सैन्यातच जायचे होते. आपल्याच देशात देशविरोधी घटना घडत असल्याचे ऐकायला मिळाले, तेव्हा प्रचंड संताप आला. त्याला बळी न पडता सर्वांनी देशसेवेसाठी सदैव तत्पर राहावे,’ असे भावुक आवाहनही यावेळी महादेवी यांनी केले.