केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे बऱ्याचदा माध्यमांशी बोलण्यापेक्षा आपल्या ब्लॉगच्या माध्यमांतून राजकीय भाष्य करण्यास प्राधान्य देतात. यापूर्वी त्यांनी अनेकदा अशा प्रकारे ब्लॉगच्या माध्यमांतून आपले विचार मांडले आहेत. नुकताच त्यांनी अमेरिकेतून एक ब्लॉग लिहीला असून यामध्ये त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “काही लोकांना आपला जन्म केवळ सत्ता गाजवण्यासाठीच झाला असल्याचे वाटते,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे.

कॅन्सरवरील उपचारांसाठी जेटली सध्या अमेरिकेत गेले आहेत. त्याठिकाणाहून त्यांनी फेसबुकवर ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये जेटली लिहितात, “काही लोक अशा राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत जिथे त्यांना वाटते की त्यांचा जन्मच सत्ता गाजवण्यासाठी झालाय. काही लोक तर असे आहेत जे डाव्या विचारांनी प्रभावित आहे. त्यांच्यासाठी एनडीएचे सरकार स्विकारार्ह नाही. त्यामुळे ते कायमच सरकारच्या कल्याणकारी योजनांमध्ये त्रुटी शोधत असतात.”

जेटली म्हणतात, सातत्याने टीका करणारे हे लोक सरकारच्या त्या प्रत्येक प्रस्तावात त्रुटी शोधत असतात जे लोकांच्या विकासासाठी आहे. यामध्ये १० टक्के आरक्षण, आधार कार्ड, नोटाबंदी, जीएसटी, आरबीआय तसेच सीबीआय वाद, राफेल डील, सुप्रीम कोर्ट किंवा न्या. लोया मृत्यूप्रकरण यांचा यात समावेश आहे.

न्या. लोया प्रकरणी बोलताना जेटलींनी लिहीले की, जेव्हा न्या. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय सुनावला तेव्हा लोकांकडून सोशल मीडियातून यावर टीका झाली. ते पुढे म्हणाले की, जर हा निर्णय माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी घेतला असता तर त्यांनी काय केले असते. तसेच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या घटनेलाही त्यांनी दुर्देवी असल्याचे म्हटले आहे.

राफेल मुद्द्यावर जेटलींनी लिहीले की, काँग्रेसने यावरुन संसदेपासून रस्त्यापर्यंत खोटं बोलत सरकारच्या प्रतिमेवर आघात करण्याचे काम केले. या मुद्द्यावरुन संसदेतही ते वाद-विवादात हारले, मात्र तरीही त्यांचा अपप्रचार करण्याचा उद्योग सुरुच आहे.