हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालावर एका तरुणीने छेडछाडीचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता भाजपमधूनच बराला यांच्याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. नैतिकतेच्या मुद्यावर बराला यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या एका खासदाराने केली आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणातील आरोपींना ‘मद्यधुंद गुंड’ म्हणत त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सुभाष बराला यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे.

सुभाष बराला यांनी पक्षाच्या कारवाईची वाट न पाहता स्वत:हून राजीनामा द्यावा, असे कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार राजकुमार सैनी यांनी म्हटले आहे. ‘आमच्या पक्षाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी घोषणा दिली आहे. छेडछाडीचा आरोप एखाद्या सामान्य व्यक्तीवर झालेला नसून, तो पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर झाला आहे. कुटुंबाकडून ज्या प्रकारचे संस्कार दिले जातात, तशीच मुलांची वर्तणूक असते. त्यामुळे बराला यांनी पक्षाच्या प्रतिमेचा विचार करुन नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा,’ असे सैनी यांनी म्हटले. तर भाजप खासदार किरण खेर यांनी कोणत्याही व्यक्तीला तरुणीला किंवा तरुणींना घाबरवण्याचा अधिकार नसल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

भाजपच्या खासदारांनी सुभाष बराला यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्या मुलाच्या कृत्याची पाठराखण केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील या प्रकरणात आक्रमक होत बराला यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छेडछाड प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले आहे.

हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास याने मागील आठवड्यात एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या गाडीचा पाठलाग केला होता. यानंतर या मुलीसोबत छेडछाडदेखील करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात विरोधकांनी हरियाणा सरकार आणि सुभाष बराला यांच्यावर शरसंधान साधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे बराला यांनी प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे.