सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश आणि अन्य चार वरिष्ठ न्यायाधीशांमधील वादावर सोमवारी पडदा पडला. सोमवारी सुप्रीम कोर्टातील सर्व कोर्टांचे कामकाज सुरळीत सुरु असून न्यायाधीशांमधील वाद अंतर्गत होता आणि तो वाद मिटल्याची माहिती सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी दिली.

सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेने सर्वोच्च न्यायपालिका हादरली होती. सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर याचे पडसाद उमटतील अशी शक्यता होती. मात्र, सोमवारी सुप्रीम कोर्टातील सुरळीत कामकाज सुरु झाले, हा वाद मिटला आहे, अशी माहिती सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रीम कोर्ट ही निष्पक्ष यंत्रणा असून ती अबाधित राहावी, असे मतही त्यांनी मांडले. महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी देखील वाद मिटल्याचा दावा केला आहे. सरन्यायाधीश आणि पत्रकार परिषदेतील दोन न्यायाधीशांनी ‘चाय पे चर्चा’ करत वादावर तोडगा काढल्याचे एबीपी न्यूज वृत्तवाहिनीने म्हटले आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणावरुन सुरु असलेला वाद निरर्थक आहे. त्यांच्या मुलानेही वडिलांच्या मृत्यूबाबत कोणावरही शंका नसल्याचे स्पष्ट केले, असे मिश्रा यांनी सांगितले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. सरन्यायाधीशांची कार्यपद्धती मनमानी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मनन मिश्रा यांनी रविवारी दीपक मिश्रा यांची भेटही घेतली होती.