प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात सुरु असलेले आंदोलन चिघळले आहे. बुधवारी देखील या भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या आंदोलनात १२ जणांना जीव गमवावा लागला आहे.

तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात ११ जण ठार झाले होते. तर २० जण जखमी झाले होते. बुधवारी या भागात कडेकोट बंदोबस्त होता. मद्रास हायकोर्टानेही प्रकल्पाच्या विस्तारास स्थगिती दिली. पण स्थानिकांमधील असंतोष कमी झाल्याचे दिसत नाही.

बुधवारी दुपारी पुन्हा एकदा आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असून यात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.