राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादवने पत्नी ऐश्वर्या रायसोबतचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. तेज प्रतापने नवविवाहित वधूला सायकलवर डबलसीट बसवल्याचा हा फोटो आहे. तेज प्रताप आणि ऐश्वर्या परस्परांकडे पाहून नजरेमधून प्रेम व्यक्त करत असल्याचा हा रोमँटिक फोटो आहे.

१५ मे रोजी पाटण्याच्या मैदानावर तेज प्रताप आणि ऐश्वर्याचा शाही विवाह पार पडला. अनेक हायप्रोफाईल पाहुणे मंडळी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. चारा घोटाळयात तुरुंगवासाची शिक्षा झालेले लालू प्रसाद यादवही खास या लग्नासाठी पॅरोल बाहेर आले होते. ऐश्वर्या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. तिचे वडिल चंद्रिका राय आमदार आहेत.

विवाहसोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींसह बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली. यावेळी नितीशकुमार यांनी नवदाम्पत्याला आशिर्वाद दिले. यावेळी लालू आणि नितीश यांची गळाभेटही झाली. राजकारणात सध्या भलेही हे दोघे एकमेकांचे शत्रू असले तरी या विवाहसोहळ्याने त्यांना एकत्र आणल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता.

नितीश कुमार यांच्याशिवाय या विवाहसोहळ्यात माजी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, राम जेठमलानी, अखिलेश यादव, डिंपल यादव यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा खास बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवण्यात आली नव्हती. या सोहळ्याला ७००० पेक्षा अधिक पाहुण्यांनी हजेरील लावली.

लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांना एकूण ९ मुले असून त्यांपैकी पहिल्या ७ मुली आणि २ मुले आहेत. तेजप्रताप आठवा तर तेजस्वी यादव सर्वात लहान ९ वा मुलगा आहेत. लालूंच्या ७ मुलींची यापूर्वीच लग्न झाली आहेत. त्यानंतर तेजप्रताप या पहिल्याच मुलाचे लग्न असल्याने त्यांनी ते धामधुमीत करण्याचे ठरवले होते. त्यानुसार हा विवाहसोहळा पार पडला.