‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण मागील दोन आठवड्यांमध्ये चांगलेच तापले होते. भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्यानंतर हा वाद शांत झाला. मात्र या दरम्यान या पुस्तकावरुन अनेक शिवभक्तांनी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपाच्या गोयल यांच्यावर टीका केली. हा वाद शांत होत असतानचा आता भाजपाच्या एका खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना थेट भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन भाजपावर टीकास्र सोडले आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुतील दक्षिण बंगळुरू मतदारसंघाचे भाजपाचे २८ वर्षीय तेजस्वी सूर्या यांनी अमित शाह यांना एक चित्र भेट दिलं आहे. या चित्रामध्ये उजव्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो आहे तर डाव्या बाजूला अर्धा फोटो अमित शाह यांचा दिसत आहे. सुर्या यांनी शाह यांना हे पेटींग भेट देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादीचे म्हणणे काय?

शाह यांना पेंटींग भेट देतानाचा सूर्या यांचा फोटो ट्विट करत राष्ट्रवादीने भाजपावर निशाणा साधला आहे. अंधभक्तच नाही तर भाजपाच्या खासदारांकडूनही महापुरुषांशी भाजपाच्या नेत्यांची तुलना केली जात आहे असा टोला राष्ट्रवादीने या ट्विटमधून लगावला आहे. “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शाह यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुनयी खासदारांकडूनही होत आहे,” असं राष्ट्रवादीने आपल्या ट्विटनमध्ये म्हटलं आहे.

सूर्या काय म्हणाले?

सूर्या यांनी ट्विटवरुन हा फोटो शेअर केला आहे. सूर्या यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी ही भेट शाह यांना दिली. “जा जिंकून ये शाह यांच्या या शब्दांमुळेच मला निवडणूक लढण्याची प्रेरणा मिळाली आणि आज खासदार झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते माझ्या कार्यलयाचे उद्घाटन झाले आहे. मी नवीन भारतासाठी सरदार पटेल आणि अमित शाह यांचा आभारी आहे,” असं सूर्या यांनी ट्विट केलं आहे.

नव्या वादाला तोंड?

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन झालेल्या वादावरुन वातावरण शांत झाले असतानाच आता सूर्या यांनी केलेल्या या तुलनेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप राष्ट्रवादीने केलेल्या टीकेवर सूर्या यांनी काहीही उत्तर दिलेले नाही.