बॅरीस्टर मोहम्मद अली जिना यांच्या मागणीनंतर काँग्रेसने फाळणीचा निर्णय स्वीकारला अशी खरमरीत टीका करत आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर विरोधकांना उत्तर दिलं. भारताची फाळणी करायची हा निर्णय जिना यांनी घेतला होता. मात्र काँग्रेसने त्यांच्या या निर्णयाला मान्यता दिली. काँग्रेसने हा निर्णय कसा काय स्वीकारला? हा माझा प्रश्न आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे नागरिकत्व देण्याचं बिल आहे घेण्याचं नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला सोमवारी पाठिंबा दिला आणि मंगळवारी विरोध दर्शवला. सत्तेसाठी रंग बदलणाऱ्यांनी एका रात्रीत विरोध दर्शवला अशीही बोचरी टीका अमित शाह यांनी केली.

या चर्चेत अमित शाह यांनी कपिल सिब्बल यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. कपिलजी म्हणाले होते मुस्लिम आपसे नहीं डरते. मी यावर हेच म्हणेन की, “मुस्लिम बांधवांनी घाबरायचीही गरज नाही. भारतात राहणाऱ्या एकाही मुस्लिम माणसाला घाबरण्याची आवश्यकता नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे नागरिकत्त्व हिसकावण्याचं नाही तर ते प्रदान करण्याचं विधेयक आहे” असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.