करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना आता एक नवी माहिती समोर आली आहे. यानुसार माशांमुळेही करोना होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जगविख्यात साप्ताहि‌क द लॅन्सेटच्या संधोधनातून ही माहिती समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने माशीच्या माध्यमातून करोनाची लागण होऊ शकते यासंबंधी माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, करोनामधून बरा झालेल्या व्यक्तीच्या विष्टेत करोनाचे विषाणू जिवंत असतात. हे विषाणू मानवी विष्टेवर आठवडाभर जिवंत राहू शकतात. या विष्टेवर बसलेली माशी फळं, भाज्यांवर बसल्याने करोना आजार परसण्याची भीती असते.

“सध्या आपला देश करोनाशी लढत आहे. त्यात आपल्या सर्वांना महत्त्वाची भूमिका निभवायची आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, चीनमधील काही तज्ञांच्या निदर्शनात आलं आहे की, करोना विषाणू मानवी विष्टेत अनेक आठवडे जिवंत राहू शकतो. करोना व्हायरसचा रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या विष्टेत काही आठवडे विषाणू जिवंत राहू शकतात. जर अशा व्यक्तीच्या एखादी माशी बसली आणि ती फळं, भाज्या, अन्नावर बसली तर ही आजार अजून पसरु शकतो,” असं अमिताभ व्हिडीओत सांगत आहेत.

करोनाशी लढण्यासाठी आपण स्वच्छ भारत, पोलिओमुक्त भारतासाठी ज्याप्रमाणे जनआंदोलन केलं त्याप्रमाणे एकत्र आलं पाहिजे असं आवाहन यावेळी अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. प्रत्येकाने दररोज, नेहमी, कायम आपल्या शौचालयाचा वापर करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरवाजा बंद तर आजार बंद हे लक्षात ठेवा असंही ते म्हणाले आहेत.