भारतातल्या खेड्यांनी करोनाशी अत्यंत शिस्तीने आणि निकराने सामना करत इतर शहरांपुढेही आदर्श ठेवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सहा लाखांपेक्षा जास्त खेडी भारतात आहेत. या खेड्यांमध्ये सुमारे ८० कोटी लोक राहतात. या गावांनी करोनाचा सामना अत्यंत प्रभावीपणे केला आहे. करोनाच्या संकटामुळे सगळं जग हादरलं पण भारतातली खेडी अशी आहे ज्यांनी अत्यंत संयम आणि निकराने या संकटाचा सामना केला. इतकंच नाही तर देशातल्या शहरांपुढेही एक आदर्श घालून दिला असंही मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- आतापर्यंत शहरांना झळाळी दिली, आता गावांसाठी काम करा; पंतप्रधान मोदी यांचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त हाल कुणाचे झाले असतील तर ते स्थलांतरित मजुरांचे. या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्याचमुळे मजुरांच्या रोजगारासाठी आता केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी भारतातल्या खेडेगावांमधील लोकांनी करोना काळात दाखवलेल्या शिस्तीचं कौतुक केलं.

आणखी वाचा- गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

आणखी काय म्हणाले मोदी?

“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावं. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. पण, ते आता गावांसाठी करावे,” असं आवाहन मोदी यांनी केलं.