देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत नऊ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता करोनानं ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात दिवसाला आठ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामळे मृत्यू झालेल्यांची संख्याही सहा हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत सहा हजार ७५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. २४ तासांत ९ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या दोन लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी करोनावर मात केली आहे. तर एक लाख सहा हजार ७३७ जणांनर उपचार सुरू आहेत.

देशभरात सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात सध्या ७४८६० करोनाबाधित आहेत. यापैकी ३२ हजार ३२९ जणांनी करोनावर मात कली आहेत. तर २५८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे ६५.७३ लाख रुग्ण झाले आहेत. करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १९ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत सातव्या स्थानी असून भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेनचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत.